तुमचा काळ आणि समकालीन जगाबद्दलच्या तुमच्या समजुती, परदेशी संस्कृती, समकालीन आंतरराष्ट्रीय घटना, तुमच्या यशाची तुम्हाला द्यावी लागलेली किंमत , शोषण आणि भेदभाव, व्यापार आणि व्यवसाय, संघर्ष, आक्रमण, युद्धे, स्थलांतर यांचे अनुभव तुमचे व्यक्तीमत्व अगदी छिन्नी हातोड्याने घडवत असतात. हे सर्व घटक एकमेकात गुंतलेले असतात. त्यांचे अस्तित्व स्वतंत्र नसते. आणि त्याहून महत्वाचे हे घटक सातत्याने बदलत असतात. सर्व सृष्टीच सातत्याने बदलत असते. त्यामुळेच आज माझ्यावर प्रभाव टाकणारे घटक उद्या तुम्हाला प्रभावित करू शकत नाहीत. त्यामुळेच या भिन्न परंतू एकमेकात गुंतलेल्या घटकांची एकत्रित कल्पना करून त्यांचा रोजच्या जीवनावर आणि दीर्घकालीन भविष्यावर काय परिणाम होऊ शकेल याचा अंदाज करणे भल्याभल्यांनाही चितपट करते. खरे तर हे सर्व घटक व त्यांची सर्व जीवन प्रभावित करणारी सरमिसळ म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाची व्याख्याच अशी आहे की ज्यामध्ये सर्व ‘समाविष्ट’ आहे. सर्वामधे याची जाणीव असते. पण याचे सतत आकलन व त्याविषयी जागृत राहणे व सर्व पर्यावरणाचा विशाल दृष्टिकोन सतत चेतता ठेवणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आणि त्याहून अवघड म्हणजे हा दृष्टिकोन निस्वार्थी ठेवणे.
असामान्य मानवांचीच अशी विकसित अंतर्दृष्टी ही उद्दिष्टे, कृती आणि परिणामांचे योग्य मूल्यमापन करू शकते. भेदक व निरपेक्ष वृत्तीने इतरांचे हेतु तपासु शकते. आणि अशा व्यक्तिमत्वात अजून दुर्मीळ व्यक्तिमत्व म्हणजे म्हणजे जे व्यक्तिमत्व यात सुधारणा व्हावी व हे घटक बिघडू नयेत म्हणून जनजागृती करून लोकांचा भरघोस पाठींबा मिळवून सार्वजनिक लढा वा चळवळ उभारू शकते.
आज आपण गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या असामान्य ग्रेटा थनबर्गच्या अवघ्या विशीतल्या आयुष्याचा आढावा घेणार आहोत.
सळसळत्या विशीच्या उत्साही आणि सर्जनशील वयातच असे भव्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एकहाती सर्व सिस्टीम विरूद्ध उभे राहून बदल करण्याचे बळ असते. फक्त आता ग्रेटाची दृष्टी आणि धारणा यावर आता कुठलाही अनिष्ट प्रभाव पडून ती भरकटू नये यात जगाचे हित सामावले आहे यात कोठेही अतिशयोक्ती नाही. या मुलीने आपल्या असामान्य विचारसरणीने व कृतीने ‘युरोपियन युनियन ‘ला संपुर्ण युरोप खंडाचे पर्यावरण विषयक धोरण बदलायला लावले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून बोलताना तिने जागतिक नेत्यांना घाम फोडला होता. ती त्यांच्या सत्तासामर्थ्याने दिपली नाही.त्यांच्या स्तुतीमुळे खुश होऊन तिने त्यांच्या दांभिकपणाचा मुखवटा टरकावणे थांबवले नाही वत्यांच्या गर्भित धमक्यांना तिने भीक घातली नाही. विद्यार्थी दशेतच सर्व जगातील विद्यार्थ्यांना तिने एकवटून दाखवून जगापुढे एक खराखुरा निस्वार्थी आदर्श उभा केला होता.
ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो तिला ‘ब्रॅट’ (तिरस्काराने चांगले नसलेल्या मुलासाठी वापरत असलेले विशेषण)म्हणतात.
आणखी एक सुप्रीमो, रशियन अध्यक्ष पुतिन यांनी तिला ‘ ती दयाळू परंतु कमी माहिती (थोडक्यात नासमज)असलेली लहान पोर ‘टीनएजर’ असे हिणवले.
ब्रॉडकास्टर ज्युलिया हार्टले-ब्रेवरने ग्रेटाला जी शेलकी विशेषणे लावली होती ती तिला ट्विटर (आता ‘एक्स’) वरून हटवावी लागली. तिने ग्रेटाला “अर्धशिक्षित, ऑटिस्टिक, नकारात्मक, जगाचा विनाश होणार अशा वृत्तीची इको-कल्टिस्ट म्हणून घोषित केले होते!
आणि नेहमी जास्तच बोलणारे, अमेरिकेचे माजी अध्यक्ष, ट्रम्प यांनी तिची ट्विट करत थट्टा केली – “ग्रेटाने तिच्या (पर्यावरणाच्या ढासळत्या जागतिक व्यवस्थापनावरिल रागाऐवजी)स्वतःच्या रागाच्या व्यवस्थापन समस्येवर काम केले पाहिजे… ग्रेटा, ‘चिल’!”
विवादास्पद ब्रिटिश-अमेरिकन किकबॉक्सर अँड्र्यू टेटने तिची वाहनाकडून होणा-या प्रदुषणावरिल टीकेची खिल्ली उडवताना आपल्या 33 गाड्यांची यादी प्रसिद्ध करून त्या गाड्यातून होणारे मोठ्या प्रमाणातील कार्बन उत्सर्जनाचे आकडे पाठवण्याचे जाहीर करून ग्रेटाला उचकवून तिला वादात चिथावण्याचा प्रयत्न केला! तिचा प्रभाव कमी व्हावा म्हणून पध्दतशीरपणे वर्षानुवर्षे तिला नोबेल पारितोषिक नाकारले, परंतु तिने या सर्वांकडे काहीवेळा दुर्लक्ष करून तर काही वेळा चोख प्रत्युत्तर देवून स्वत: ला विकसित करणे थांबवले नाही. ती सर्व व्यवस्थेशी लढत राहिली.
तिच्या वडिलांनी सांगितले की ती आठ वर्षांची असताना तिने बोलणे बंद केले आणि शाळेत जाणे बंद केले.तिला ‘ ॲस्पर्गर्स सिन्डोम’ (Asperger’s Syndrome )चे निदान झाले. हा मज्जासंस्थेशी निगडीत विकार असून ऑस्ट्रियन फिजिशियन डाॅ हॅन्स एस्पर्जर यांनी 1944 मध्ये त्याची लक्षणे प्रथम वर्णन केली होती. एस्पर्जर सिंड्रोमचा बुद्धिमत्ता किंवा संवाद आणि भाषा कौशल्यांवर फारसा परिणाम होत नाही. सामाजिक संवादावर होतो! लोक एकाच विचारावर किंवा कल्पनेवर अधिक केंद्रित होतात ही क्षमता आश्चर्य कारक रितीने वाढते.
स्वतः ग्रेटा ही त्याविषयी सांगते.
“वेगळे असणे ही एक देणगी आहे”, तिने बीबीसीवरील मुलाखतीत सांगितले होते. “यामुळेच मी ‘आऊट ऑफ बाॅक्स’ वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकते. आणि खरे तर ॲस्पर्गर सिन्डोमच मला असा विचार करण्यास भाग पाडतो. मी खोटे बोलत नाही व खोट्या बोलण्याला बळीही पडत नाही. मी काही बाबतीत एखाद्याच्या आरपार पाहू शकते (तो जरी काही लपवत असला किंवा वरून वेगळेच दाखवत असला तरी ओळखू शकते. माझ्यापासून काही लपून रहात नाही). ईतर सर्व बाबीत मी नाॅर्मल व इतरासारखीच आहे. (तसे नसते तर) उदाहरणार्थ, मी हा शाळेचा संप सुरू केला नसता.”( तो संप तिने शाळेत केवळ पंधरा वर्षांची असताना केला होता).
—क्रमशः

Leave a comment