मराठी ⏯️ अल-शारा: पश्चिम अशियाई अस्थिरतेतील नवीन चेहरा!

अल-शारा
पश्चिम अशियातील उलथापालथीतील नवीन चेहरा!

२०२४ च्या उत्तरार्धात सीरियामध्ये बदलाचे वारे वाहू लागले, दशकांपासूनची सत्ता उलथून टाकली गेली आणि एका गहन अनिश्चिततेच्या, पण अनेकांसाठी आशेच्या किरणाच्या युगाची सुरुवात झाली. या वादळी संक्रमणाच्या केंद्रस्थानी आहे अहमद अल-शारा. एक तरुण दहशतवादी, अंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि मुस्लिम धर्माचा डोळस संशोधक व कट्टर अनुयायी आणि आता थेट सिरीयाचा अध्यक्ष!

भावुक व एखाद्या तत्ववेत्यासारखे डोळे, भरपूर उंची व तगडी शरीरयष्टीचा हा युवक हुशार व मुत्सद्दी आहे. हा त्याचा अभूतपूर्व आणि अनेकदा वादग्रस्त हिंसेने भरलेला मार्ग एखाद्या अद्भुत कहाणी पेक्षा व हॉलीवुडच्या सिनेमापेक्षा कमी नाही.
पश्चिम अशियातील अनेक वादग्रस्त देशांचे एककल्ली हुकुमशहा, लोकशाहीचे ढोंगी कातडे पांघरलेले हुकुमशहा, राजेशाहीतून बाहेर येण्यास तयार नसलेले तेलसम्राट राजे, गुंतागुंतीचा वादग्रस्त इतिहास असलेले देश, त्याला कायमस्वरुपी लागलेले इस्त्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचे ग्रहण, गाझा स्ट्रीपमधे सुरु असलेला नरसंहार, अण्वस्त्रसज्ज होउ पाहणारा अमेरिकेचा कट्टर शत्रु इराण, सर्व जगाला भेड्सावणारा अल-कायदा व इसिस मुस्लिम धर्मांध दहशतवाद यात आता या नवीन मुस्लिम दहशतवादी पार्श्वभूमी असलेल्या व सिरिया सारख्या अस्थिर झालेल्या देशाच्या थेट ‘प्रेसिडेंट’ बनलेल्या अल-शाराची भर पडली आहे.

अल-शाराचा जन्म १९८२ मध्ये सौदी अरेबियातील रियाध गोलान हाइट्समधील सीरियन सुन्नी मुस्लिम कुटुंबातला. शांत व अभ्यासू स्वभावाच्या अल-शाराचे पौगंडावस्थेतले जीवन सर्वसामान्य मुस्लिम मुलासारखेच होते. पण आजुबाजुची परीस्थिती मात्र अरब देशातील अशांतता, धार्मिक कट्टरवाद, पॅलेस्टाइनी संघर्ष, अमेरिकन पाश्चात्य जीवन पध्द्तीशी होत असलेला वैचारिक संघर्ष, धर्मगुरुंचे फतवे यानी सतत खदखदणारी होती. अल-शाराचा जीवनाविषयक दृष्टीकोन यातून घडत गेला. कदाचित त्यामुळे अत्याचार आणि प्रतिकार, आधुनिकता व शरीया याबध्दल त्याची स्वत:ची अशी मत तयार झाली असावीत.

यामधे त्याची अस्वस्थता ज्यावेळी पराकोटीला पोहोचली त्यावेळी अल-शारा सिरीयातून परागांदा झाला व थेट इराकला पोहोचल. अमेरीकेने व्याप्त केलेल्या इराक मधिल अल-कायदाच्या ‘अल-कायदा इन इराक’ (AQI) मध्ये तो सामील झाला व इराकींच्या खांद्याला खान्दा लावून लढू लागला.

इराक मधिल अशा बाहेरील देशातून आलेल्यांची संख्या वाढू लागल्यावर अमेरिका व इराकी सैन्याने मोठी शोध मोहीम सुरु केली आणि अल-शारा त्यात सापडला तेथे त्याने आपण उत्तर इराकमधील आहे अशी बतावणी केली त्यामुळे त्याची रवानगी झाली कॅम्प बुका या अमेरिकन ‘डीटेन्शन सेंटर’ मधे.

2006 ते 2011 अल-शाराने अमेरिकन सैन्याच्या ताब्यात काढली हा काळ त्याच्या जीवनात मोठा निर्णायक ठरला. येथे सिरिया मधे अल-कायदाची स्थापना करण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. सिरीयाचा प्रादेशिक व भौगोलीक अभ्यास विशेषत; त्याने पूर्ण केला. याच ठिकाणी अल-शाराची भावी ‘आयसिस’चा क्रुरकर्मा प्रमुख स्वयंघोषित खलिफा अबू बकर अल-बगदादीशी पहिली भेट झाली. आणि येथेच अल-कायदा च्या अल-जवाहीरीशीही त्याचे संबध प्रस्थापित झाले.
यातूनच अल-शाराची सुटका झाल्यावर अल-बगदादीने 2011 मधे सिरीयात अल-कायदाचा प्रवेश त्याच्यामार्फत घडवुन आणला.

सिरियात त्यावेळी ‘अरब जगातील देशात एका मागोमाग होणा-या उठावासारखी स्थिती होती. (ज्याला ‘अरब स्प्रिंग’ म्हणतात). सिरीयन जनता असाद राजवटी विरुद्ध रस्त्यावर उतरली होती. असाद यांच्या सेनेने केमिकल अस्त्रे व विषारी वायू जनतेविरुध्द वापरले आहेत त्यामुळे व सिरीयामधे रशिया व इराण यांचे वर्चस्व वाढ्त असल्याने अमेरिकन सेनाही थोड्याच काळात सिरीयात इराक प्रमाणे घुसणार असे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात बराक ओबामा याना ते शक्य झाले नाही. दरम्यान अल-शाराच्या सुटकेनंतर, सीरियन क्रांतीच्या उदयाशी जुळवून घेत,
अल-शाराला अल-बगदादीने २०११ मध्ये अशांत सीरियामध्ये अल-कायदाची उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी पाठवले.

त्या प्रमाणे मायदेशात आल्यानंतर अल-शाराने २०१२ मध्ये अल-नुसरा फ्रंटच्या नामकरणाखाली स्थापना केली. सुरुवातीला, अल-नुसरा अल-बगदादीच्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक (ISI) शी संलग्न एक गुप्त गट म्हणून कार्यरत होती, ज्याला अल-बगदादीकडून महत्त्वपूर्ण निधी, मनुष्यबळ आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळत होते.
अल-नुसरा काही काळातच अल-शाराच्या नेतृत्वाखाली सीरियन गृहयुद्धात एक शक्तिशाली शक्ती बनली, आणि असादच्या सेनेशी त्याचा जोरदार संघर्ष सुरु झाला.

अल्पावधीतच अल-नुसराने त्यांच्या भागात सिरीयन सेनेवर जोरदार हल्ले करुन पिटाळून लावले व अक्षरश: समांतर सरकारची स्थापना केली.त्याची त्या काळात सुरुवातीची वर्षे इस्लामिक कायद्याच्या कठोर अर्थाने आणि सीरियामध्ये शरिया लागू करण्यावर लक्ष केंद्रित करत होती, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांमध्ये आणि अल्पसंख्याक गटांमध्ये त्यांच्यावरील हल्यामुळे व वाढ्त्या अरेरावी मुळे चिंता वाढली होती. त्याना वाटत होते इसिस वा अल-कायदाचाच अल-नुसरा हा नवीन अवतार आहे.
तथापि, अल-शारा आणि अल-बगदादी यांच्यातील सहकार्य अल्पकाळ टिकणारे आणि शेवटी तर कडवट ठरले.

एप्रिल २०१३ मध्ये अल-बगदादीने एक अनपेक्षित आणि एकतर्फी घोषणा केली. त्याने आपल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराकचे अल-नुसरा फ्रंटमध्ये विलीनीकरण करून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हेंट (ISIL), जे नंतर ISIS म्हणून ओळखले गेले, स्थापन करण्याची घोषणा केली.

ही धाडसी चाल अल-नुसराचे स्वतंत्र अस्तित्व समाप्त करण्याचा आणि सीरियातील सर्व जिहादी कार्यांवर अल-बगदादीचे पूर्ण अधिकार स्थापित करण्याचा थेट प्रयत्न होता. ही चाल अल-शाराने ओळखली व त्याने जाहीरपणे विलीनीकरणाचा निषेध केला व थेट बगदादीला आव्हान दिले. त्याच वेळी त्याने आपल्या गटाची निष्ठा थेट अल-कायदाचा तत्कालीन नेता अल-जवाहिरी याच्याशी असल्याचे सांगुन सीरियातील दोन सर्वात शक्तिशाली जिहादी गटांमध्ये एक महत्त्वपूर्ण आणि सार्वजनिक फूट पडली.

अल-शाराला इसिसची क्रूर आणि अंदाधुंद रक्तपाताची पध्दत पसंत नव्हती. ही त्याची वैयक्तिक विचारातील व संस्कारातील नापसंती होती का सिरियन लोकांना हा बटबटीत हिंसाचार नको होता म्ह्णून हा मुखवटा आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल.
या फुटीमुळे अल-नुसरा फ्रंट आणि इसिस यांच्यात उघड युद्ध झाले, ज्यात अल-नुसराने अनेकदा इतर बंडखोर गटांसोबत इसिस सीरियन प्रदेशातून बाहेर काढण्यासाठी लढा दिला. त्याच्या भावी राजकीय आकांक्षा याच काळात स्पष्ट होउ लागलेल्या दिसतात.

आता जनमानसातील व इतर देशातील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी त्याने २०१६ मध्ये धाडसीपणे व धुर्ततेने थेट जाहीरपणे अल-कायदाचा त्याग केला, आणि आपल्या गटाची हयात तहरीर अल-शाम (HTS) म्हणून पुनर्रचना केली. हा एक अत्यंत महत्वाचा बदल होता. आता अल-कायदा, इसिस व शरीया चे आंधळे समर्थन करणारी अल-नुसरा यांचे ऐतिहासिक जोखड एका फटक्यात अल-शाराने झुगारुन दिले.
जिहादीवादामधून स्थानिक, प्रशासन-केंद्रित दृष्टिकोनाकडे असे हे महत्त्वपूर्ण परीवर्तन ठरले. अल-शाराचे वेगळेपण येथे स्पष्ट होते.

अल-शाराने स्वत:ची अधिक उदारमतवादी, स्त्रीस्वातंत्र्याचा आदर करणारा अशी प्रतिमा सादर करण्यास सुरुवात केली, सार्वजनिक चर्चेत भाग घेतला आणि अगदी मुलाखतीही दिल्या, सीरियाच्या विविध अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि एक कार्यक्षम राज्य निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भर दिला. परंतू लोकशाही त्याला खरोखर ‘अपिल’ होते का हे येणारा काळच ठरवेल. त्याचे लग्न झाले. अनेक सार्वजनिक कार्यक्रमामधे हा नवीन जोडा जाहीरपणे उपस्थित राहू लागला. अनेक अंतरराष्ट्रीय मेडीया हाउसेस ना दिलेल्या मुलाखतीस दोघेही असायचे.
गरम रक्ताचा व त्याहून गरम डोक्याचा निर्बुद्ध हिंसाचारी दहशतवादी गटाचा आतयायी दहशतवादी प्रमुख ही प्रतिमा त्याने मोडीत काढली. त्याचे समांतर सरकार सुरु झाले.
एव्हाना असादच्या सैनिकी शक्तीचा, सिरीयातील जनमानसातील त्याच्या प्रतिमेचा व अंतरराष्ट्रीय स्तरावरील असाद चा जवळजवळ संपुष्टात आलेला प्रभाव या बाबी स्पष्ट झाल्या होत्या. एका शांत, अभ्यासु मुलगा ते तरुण दहशतवादी लढवय्याच्या जीवनातील निर्णायक घडी आली होती. 

अल-शाराने विजेच्या गतीने डिसेंबर २०२४ मधे अल-असादच्या सेनेवर झंझावती आक्रमण केले. असादची सत्ता त्याने मोडीत काढली व त्याला पार पळवून लावले. असद सिरीयातुन पार रशियात पळाला. असद राजवटीची दीर्घकाळची सत्ता संपुष्टात आलि आणि अल-शारा जानेवारी २०२५ मध्ये थेट अध्यक्ष म्हणून सिरीयाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाला.
एकेकाळी अमेरिकेने दहशतवादी घोषित केलेल्या दहशतवाद्याच्या जीवनात एक आश्चर्यकारक परिवर्तन घडले व नंतर खरोखर, काही महिन्यांतच, अल-शारा सौदी अरेबियातील एका उच्चस्तरीय परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसला.
अल-शारासमोर एक प्रचंड आव्हाने उभी आहेत. सर्व माजी बंडखोर गटांना राज्याच्या संस्थांमध्ये एकत्रित करणे, उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था पुन्हा बांधणे आणि नागरी शांतता राखणे यांचा त्यात समावेश आहे. त्याने राष्ट्रीय संवादाचे आश्वासन दिले आहे. नवीन संविधानांतर्गत अंदाजे चार ते पाच वर्षांत नवीन निवडणुका घेतल्या जातील. मार्च २०२५ मध्ये मंजूर झालेल्या अंतरिम संविधानाने एक मजबूत अध्यक्षीय प्रणाली स्थापित केली आहे, ज्यात महत्त्वपूर्ण अधिकार आपल्याकडेच ठेवून घेतले आहेत, मार्च २०२५ मध्ये घोषित करण्यात आलेल्या नवीन संक्रमणकालीन सरकारमध्ये विविध समुदायांचे, ज्यात अलाविट्स, ड्रुझ आणि ख्रिश्चन यांचा समावेश आहे, प्रतिनिधी असलेले एक विविध मंत्रिमंडळ आहे. हा निर्णय सर्वसमावेशकता आणि आंतरराष्ट्रीय स्वीकृती सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पाहिला जातो. उल्लेखनीय नियुक्त्यांमध्ये White Helmets च्या प्रमुखांना आपत्कालीन मंत्री म्हणून नियुक्त करणे, जे मानवतावादी प्रयत्न आणि पुनर्रचना यावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत देते.
पण सीरिया अजूनही सशस्त्र गटांचा एक पॅचवर्क आहे आणि सर्व गटांना एका राष्ट्रीय सैन्यात पूर्णपणे एकत्रित करणे हे एक जटिल कार्य आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय, सावधपणे निरीक्षण करत आहे , अल-शाराच्या भूतकाळाबद्दल आणि HTS च्या इस्लामी झुकावांबद्दल अजूनही सावध आहे. विश्वास पुन्हा निर्माण करणे, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि सीरियामध्ये कार्यरत असलेल्या गुंतागुंतीच्या भू-राजकीय हितसंबंधांना हाताळणे हे अल-शाराच्या नेतृत्वाची कसोटी घेईल.
अल-शाराची उदार धोरणे या पुर्वी त्याच्या बरोबर असणा-या व सिरीयात शरीया लागू करण्याची इच्छा असणा-या दहशतवादी गटाना मान्य नाही. हे कडवे ग़ट उद्या त्याच्या जीवावरही उठू शकतात. त्याने सिरीयाच्या जवळपास बाहेर घालवून दिलेल्या इसिसने पुन्हा डोके वर काढले आहे व त्यांच्यात पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. ट्रंप यानी सिरियाला साथ द्यायचे ठरवून पुर्वी घातलेले सर्व निर्बंध उठ्वण्याचे घोषित केले आहे. त्या मुळे सिरियाचे व इस्त्रायलचे सम्बंध सुरळीत होण्याची शक्यते बाबत काही सांगणे अवघड आहे.
अल-शाराला टृम्प यांच्या सम्पर्कात आणण्यात तुर्की व सौदी अरेबियाची महत्वाची भुमिका होती. अमेरीकेच्या पाठींब्यामुळे इस्त्रायल सिरीयाच्या बाबतीत थोडे ‘सॉफ्ट’ राहील असे वाटते. सत्तेवर आल्यावर इस्त्रायल यांचा संपर्क झाला आहे. तसे अल-नुसरा कार्यरत असताना व नंतरही इराणचे सिरीयातील अस्तित्व अल-शाराने शुन्य करुन टाकले होते. परंतु इस्त्रायल व सिरीयाच्या सीमेवर असलेल्या बंड्खोर गटानी पुन्हा कारवाया सुरु केल्या तर अवघड आहे. रशियाचेही सिरीयावरचे वर्चस्व नष्ट झाले आहे.
आता या बंडखोर दहशतवादी गट ज्यामधे अनेक विदेशीही आहेत त्याना रितसर सिरीयाच्या लष्करात सामिल करुन घेण्याची अफ़लातुन कल्पना अल-शाराने लढवली आहे. पण त्यात असलेल्या चीनी मुस्लीम उघ्युर लोकांच्या समावेशामुळे चीन सावध झाले आहे.
भारताने अल-शाराला मान्यता देवुन या भागात आपले पाय रोवले पाहीजेत. अल-शाराचा चुकीचा प्रभाव भारतीय मुस्लीम तरुणावर पडु नये म्हणुनही सावध असले पाहीजे. कारण विदेशी व देशातील अनेक दहशतवादी गट सिरीयात सक्रीय असल्याने व भविष्यात ही भुमी दहशतवाद्याना भारत विरोधी कारवायासाठी मिळू नये.

तसेच तुर्कीच्या अर्दोगान व अल-शारा यांचे जवळचे संबंध आहेत. परंतु अल-शारा ते एका मर्यादेपर्यत ठेवेल असे दिसते. अर्दोगान यांची जुन्या ‘ऑटोमन’ मुस्लिम साम्राज्याचे पुनरुज्जीवन करण्याची आकांक्षा लपून राहीलेली नाही तसेच पहलगाम दहशतवादी हल्यानंतर झालेल्या भारत – पाकीस्तान युद्धात तुर्कीनी केलेली पाकीस्तानची मदत व काश्मीर बाबतची भुमिका यामुळे सिरिया व तुर्की यांच्या मैत्रीला छेद देणे आवश्यक आहे.
अहमद अल-शाराचा उदय हे संघर्षाच्या अप्रत्याशित स्वरूपाचे आणि व्यक्ती घेऊ शकणाऱ्या आश्चर्यकारक मार्गांचे एक उदाहरण आहे. एकेकाळी डोक्यावर बक्षीस असलेल्या माजी जिहादी कमांडरपासून, स्थिरतेसाठी आतुर असलेल्या राष्ट्राच्या अंतरिम नेत्यापर्यंत, त्याची कथा, अबू बकर अल-बगदादीशी त्याच्या सुरुवातीच्या पण शेवटी विरोधी संबंधांशी खोलवर जोडलेली कहाणी सीरियाच्या गुंतागुन्तीच्या इतिहासातील एक आकर्षक अध्याय आहे यात शंका नाही. तो सीरियाला खरोखरच सर्वसमावेशक, लोकशाही आणि समृद्ध भविष्याकडे यशस्वीपणे नेऊ शकेल का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो केवळ त्याच्या वारशाचीच नव्हे तर लाखो लोकांची नियतीही स्पष्ट करेल.