म  दी  रा

म दी रा

प्रथम 3  व आगामी काही…

उत्कट भावावस्थेत मनाच गुंगण , चंचल मनाच अफाटत्व , स्वतंत्र अस्तित्व जाणवण व अवघ्या विश्वावर करूणेची अभ्रछाया पांघरणा-या दुःखांची संवेदनशीलता या सर्वांची मदिरेशी सच्ची यारी जूळल्यावरच अनुभुती येते.अनवट गुणगुणतं संगीत अनजान सुरिल्या धूनांवर नाचवून मदिरा  विलक्षण भावूकतांचे ऋदय झणझणणारे संगीत छेडते, कल्पना कल्पनेच्या बंधनातून मुक्त करून आनंदाच्या मुक्त उसळत्या लाटेवर नवविचारांना स्वार करून दास्याच्या आयाळीला पकडून विलक्षण स्वैर नाचवते,  भानावर येईपर्यंत दुःखांच्या कुशीत गुंगवते आजपर्यंत न ऐकलेल्या  नशिल्या सुरेल रंगेबीरंगी कल्लोळात!


पावसात बाहेरची पानझड
मन भिजवू लागते जेव्हा …
अनाम दुःखांचे शृंगार करुन,
विमनस्क मौनात मुलायम ,
रडू लागते मदिरा तेव्हा !
हुरहुरते क्षण जिवंत उमलतात
धुकाळल्या तळ्यातल्या कमळांवर
अन चुकल्या काळाची जरतारी नक्षी
अलगद  उमटते मग फिकट नीतळ
रंगीत चषकाच्या अलवार कडेवर  !
रिचवून सहस्त्र आठवांचे कढ ..
वेढून लोलकाच्या रंगीत बाहूत,
हरपल्या कुंद डोळ्यात डसते,
मग मदिरा ओठात ओठ देवून ! – ©️मिलिंद

त्या ठिबकत्या सायंकाळी
मंद उदासरम्य संधीप्रकाशात
याद तुझी भग्न कबरीवरिल फुलात
रूदन ओल्या निसर्गाचे
मनातल्या निनादत्या पावसात
स्वप्न पक्षी भावनांचे
गुंतवूनी चोच आपल्याच पिसात
शांत खिन्न भाव मनात
ओढ मात्र जागलेल्या पावलात
होते शरीर दाखल
चेतलेल्या मद्यशालात
जाग किणकीण चषकात मंद मंद
चषकातल्या तपकिरी सोनपरीत
ठिणगी लालस मंद विलगत्या ओठात
कणकण विरे समय
तरंगत्या धूम्रवलयात
पंख चषकातल्या सोनपरीचे
फुटतात हल्लक हल्लक मनात
आयष्याचा अजुनी एक दिन
कोसळतो जडावल्या रातीत ! ©️मिलिंद

आत होते सैल सैल
सुटतात पेच एक एक
निखळे समयाची मेखला
ऊरे ना मागे बाकीचे सल
मन पकडे ठेक्याची
सरसरती एक लय
वाजू लागे रक्तातून
अनजान सुरिली धून
पडती गळून मुखवटे
विचारात उतरे वीज
कल्पनेतून कल्पना मुक्त
नाचरी आनंदी  लहर
सळसळे मनात फक्त
तटतटत्या मनाचे
तुटतात सर्व बंध
लहरे मग शुन्यात
होउन पीस रंगीत – ©️मिलिंद